सूर्य ग्रहण
( वसुंधरा सूर्याच्या आशेने त्याच्याशी समरस राहत असते. परन्तु चन्द्र अमावश्येची संधि घेऊन सूर्याला गहन लावत असतो )
सूर्य ग्रहण
शृंगार तुझा गे पुनवेस बघावा वेडी
कशी लाजत उधळते हसून चांदणे गाली
अवसेस कुठे ग असतेस बाई दडून
कुशीत त्याच्या चिवचिवते मुख लपवून
कधी नसे पुळका इतका
आज का झाली अगतीका ----------।।१।।
नजर सारखी असते तेव्हां तुजवरी
बरी आज गावली अशी नेमक्या वेळी
का लवून गडे तू बघतेस सख्यास माझ्या
का नजर लावूनी ठाव घेतसे त्याचा
पुरुष जात परी निलाजरी
भिरभिरे नजर चहुवरी --------------।।२।।
ते लाजणे , कसे लोपले द्वितीयेला
कशी हासते खुदकन , घालूनी मजशी डोळा
तेव्हाच जाणले लुटले सख्यास तू पुरते
निर्लज्ज पणाचे बाकी काय ते राहाते
का घात सखे ग केला गळी पडून
प्रीति सख्यावारी जाईल कधी गळून ------॥ ३॥
Comments
Post a Comment